पुणे,तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी): फ्लिपकार्ट कंपनीसाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनातील तब्बल २४ मोबाईल फोन आणि एक कॅमेरा, असा एकूण ₹७,७१,४०१ किमतीचा ऐवज अपहार करून चोरी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सनी सुरेश गायकवाड (वय ४०, रा. करुळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन तकाराम सावंत (वय २५, रा. स्वप्नशील्प रेसीडेन्सी, मनोहर नगर, चाकण-तळेगाव रोड, तळेगाव दाभाडे) याच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६४/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०६ तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत फ्लिपकार्ट कंपनीच्या मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या महिंद्रा लोडिंग वाहन (MH-14 GU 5814) चा चालक असलेल्या आरोपीला कंपनीकडून केवळ दोन ठिकाणी वाहन थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आरोपीने तळेगावपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील डी.पी. रोड, यशवंत नगर येथे वाहन थांबवून वेळोवेळी विविध कंपन्यांचे २४ मोबाईल फोन आणि एक कॅमेरा असा एकूण ₹७,७१,४०१ किमतीचा माल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृतपणे चोरल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम व पोलीस उपनिरीक्षक मोहारे करीत आहेत.