निगडी.प्रतिनिधी दि. २६ जुलै : निगडी परिसरातील संग्राम नगर झोपडपट्टी येथे राहत्या घरी घुसून दोन महिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
या प्रकरणी अंजु बापू शेलार (वय ३०, रा. संग्राम नगर झोपडपट्टी, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग चंद्रकांत जाधव (वय २८, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संग्राम नगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी येथील फिर्यादीच्या बहिणीच्या घरी आरोपी आला. त्याने फिर्यादीला “माझ्यासोबत शिवाजीनगरला राहायला चल” असे सांगितले. मात्र फिर्यादीने नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी व तिची बहीण आयशा शाहीद शेख यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपीने फिर्यादीच्या हातावर नखांनी ओरबाडले, केस पकडून कपाळ जमिनीवर आपटले, पाठीवर चावा घेतला तसेच घरात पडलेल्या लाकडी दांडक्याने हातावर मारहाण केली. यानंतर दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.