देहूरोड,प्रतिनिधी. दि. २५ जुलै : देहूरोड पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वतःचे बँक खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी युवराज भगवान माने (वय ३५), पोलीस शिपाई, देहूरोड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. पियुष उमेश जामदार (वय १९, रा. गणेश चौक, मारुती मंदिराजवळ, तळवडे गाव, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र येथील स्वतःचे खाते साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिले. या खात्यात तक्रारीतील ₹१,२२,१०६ इतकी रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यापैकी ₹६०,००० एटीएम कार्डद्वारे काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत.