तळेगाव दाभाडे (पुणे): जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ₹ ९ लाख ७० हजार उकळून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ ते २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत वराळे (ता. मावळ, जि. पुणे) येथे ही घटना घडली. या प्रकरणी दिलीप नारायण वडेलकर (रा. वराळे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, मनोज गोपाळ देसले (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे; मूळ रा. जने मोहीदे, जि. नंदुरबार) याने “माझ्याकडे पैसे गुंतवा, बँकेपेक्षा अधिक म्हणजे ३० टक्के परतावा देतो,” असे सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेश, यूपीआय आणि रोख स्वरूपात एकूण ₹९,७०,००० स्वीकारले. मात्र, जादा परताव्याचे आमिष दाखवूनही कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) तसेच भादंवि कलम ४०६ व ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोवारकर करीत आहेत.