पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): चिखली परिसरातील स्पाईन रोडवर पार्क करून ठेवलेली होंडा अॅक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा किसन मुरगुंड (वय ३०, रा. भीमशक्ती नगर, मोरे वस्ती, स्पाईन रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. १७ जुलै २०२६ रोजी रात्री १०.०० ते १८ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.०० या कालावधीत सुमन पानटपरीसमोर, संविधान चौक ते कृष्णानगर चौक या सार्वजनिक रस्त्यावर त्यांनी होंडा अॅक्टिव्हा (क्रमांक MH-14-LZ-2963) लॉक करून पार्क केली होती.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय दुचाकी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४८२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) (पूर्वीचे भादंवि कलम ३७९) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुतार करीत आहेत.