पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत धारदार तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५(२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई दि. २१ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३६ वाजता हाफकीन कंपनी गेटसमोर, वल्लभनगर, पिंपरी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल उत्तम काकडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अमोल बाजू जाधव (वय ३६, रा. मेडी पॉईंट हॉस्पिटल परिसर, श्री जी पॅराडाईज, पीएमसी बिल्डिंग, रूम क्र. ३३, औंध, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून सुमारे १,००० रुपये किमतीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ८ जुलै ते २१ जुलै २०२६ या कालावधीत कोणतेही घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू केला होता. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी सार्वजनिक ठिकाणी तलवार बाळगून उभा असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.