पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरात बॅनर लावण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११०(२), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी तुषार दिलीप खिलारे (वय २६, रा. प्रेरणा हाऊसिंग सोसायटी, साईनाथनगर, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौक बीआरटी रोडवरील आर. जे. कॅफे येथे ते मित्र अनिस याच्यासोबत बॅनर लावण्याबाबत चर्चा करत होते.
त्यावेळी शेजारच्या टेबलावर बसलेल्या आरोपींपैकी एकाने “तुमची लायकी आहे का बॅनर लावण्याची?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने विरोध केल्यानंतर आकाश राऊत, अक्षय हिप्परकर, आदित्य (पूर्ण नाव माहीत नाही) आणि ‘बुटवा’ (पूर्ण नाव माहीत नाही) या चौघांनी संगनमताने फिर्यादीवर हाताने तसेच खुर्चीने हल्ला केला.
या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाला तसेच डाव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.