आळंदी (प्रतिनिधी): आळंदी येथील भाजी मंडई परिसरात किरकोळ वादातून बांधकाम व्यावसायिकावर दगडाने हल्ला झाल्याची घटना रविवारी (२० जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन नंदकुमार कुऱ्हाडे (वय ३७, रा. विठ्ठल-रुक्मिणी चौक, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २० जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गट क्रमांक ३ अ/११, भाजी मंडई शेजारी, इंद्रायणी टॉवरच्या दक्षिण बाजूस घडली.
फिर्यादीनुसार, शेजारी राहणाऱ्या महिलेने “येथे काम करायचे नाही” असे म्हणत शिवीगाळ केली. तिला समजावण्याचा प्रयत्न करत असताना तिने संतापाच्या भरात दगड उचलून फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळी व शेजारच्या बोटाला दुखापत झाली.
या प्रकरणी नोषाद सिकंदर पठाण (रा. आळंदी) यांच्याविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७३/२०२६ नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.