पिंपरी : पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक कॅबीनच्या शेजारी गेल्या कित्येक महिन्यांपासून ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी अस्वच्छता कायम असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्य प्रवेशद्वारातून आत ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्डे व चिखलामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण यांचे पाय अडकून किंवा घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावर साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अशा अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करून सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी पिंपरी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे आणि नागरिकांकडून होत आहे.
