दोन पिस्तुले, १५ काडतुसे आणि क्रेटा कार जप्त, रावेत पोलिसांची उत्तम कामगिरी
रावेत, प्रतिनिधी: रावेत पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील दोन फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि क्रेटा कार असा एकूण सुमारे ११ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सराईत, फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध अग्निशस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड आणि अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
रावेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी विनोद निजप्पा गायकवाड (रा. रमाबाईनगर, रावेत) आणि अक्षय प्रभाकर साबळे (रा. काळभोरनगर, आकुर्डी) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. फिर्यादीला मारहाण करून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींवर यापूर्वीही शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांच्या पथकाने जाधववस्ती, रावेत परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील क्रेटा कारची झडती घेतली असता दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन जप्त करण्यात आले.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, सहायक पोलीस फौजदार संतोष कोळगे, पोलीस हवालदार आशिष बोटके, गोविंद चव्हाण तसेच विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम, निखील कपले आणि लोखंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
