पिंपरी, दि. १४ जुलै : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अखेर संबंधित कंपनीच्या प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५(अ), १२५(ब) व ३(५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने सोहन मधुकर निकम (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (प्रकल्प प्रमुख, अॅटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.) आणि विजय रामराव सपकाळ (सेफ्टी अधिकारी) यांना आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मोशी कचरा डेपो परिसरात एसएलएफ (सॅनिटरी लँडफिल) चा काही भाग ढासळून इमारतीवर व शेजारील रस्त्यावर कोसळला. या दुर्घटनेत तेथे काम करणाऱ्या कामगारांचा ढिगाऱ्याखाली अडकल्याने नऊ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले.
फिर्यादीनुसार, पावसाळ्यात एसएलएफ सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक तपासणी करणे आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करणे ही कंत्राटदार कंपनीची जबाबदारी होती. मात्र, प्रकल्प प्रमुख व सेफ्टी अधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेतली नाही. त्यामुळे एसएलएफचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली आणि नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.
