पिंपरी चिंचवड (वाकड) दि. १२ जुलै : वाकड परिसरातील बेरगाव येथे किरकोळ वादाच्या रागातून एका तरुणाने दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ११ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.५० वाजता पवारनगर, गल्ली क्रमांक ३ येथील ‘कुच पान शॉप’समोर घडला. या प्रकरणी अविनाश अजिनाथ बाबर (वय ४३, रा. आदर्श कॉलनी क्र. ४, संदीप मेडिकल शेजारी, बेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांचे कॉन्ट्रॅक्टर विजय भोईर हे बिगारी कामासाठी मजूर शोधत असताना आरोपी अभि ऊर्फ अभिषेक कोळेकर (वय २५, रा. रानूबाई शाळेजवळ, पडवळनगर, बेरगाव) याने त्यांच्याशी वाद घातला. आठ दिवसांपूर्वी झालेल्या एका भांडणात फिर्यादीचा मुलगा चेतन याने मध्यस्थी केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याच रागातून आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी व विजय भोईर हे पानटपरीसमोर मोटारसायकलवर थांबले असताना आरोपीने मोबाईल क्रमांक विचारण्याचा बहाणा करून जवळ येत, “तुझ्या पोराच्या आधी तुझेच मुंडके कापतो,” अशी धमकी दिली. त्यानंतर धारदार चाकूने फिर्यादीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच विजय भोईर यांच्या पाठीवरही वार करून त्यांनाही जखमी केले.
या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १०९(१) व ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार पुढील तपास करीत आहेत.