घटनास्थळी भेट देऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली बचाव यंत्रणेशी चर्चा
पिंपरी, प्रतिनिधी : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेतील अडकलेल्या व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतालचा मलबा हटवला जात असून इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. या इमारतीत जवानांना प्रवेश करण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य हाती घेण्यात येणार आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. बचावकार्याची सद्यस्थिती, शोधमोहीमेची प्रगती, उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रसामग्री, तांत्रिक साधनांचा वापर तसेच पुढील नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देत, विविध यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय ठेवून कोणतीही कसर न ठेवता शोध व बचावकार्य सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भारतीय सैन्य दलाचे कर्नल आर. के. तिवारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सेकंड कमांड दीपक तिवारी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी बचावकार्यातील पुढील मोहिमेबद्द्ल माहिती दिली. ते म्हणाले, दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये बचावकार्यातील जवानांना सुरक्षित व सहजतेने प्रवेश करणे कठीण जात आहे. त्यामुळे इमारतीच्या आजुबाजूला असलेला मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय, बचावकार्य करताना इमारतीचा धोकादायक भाग अडथळा ठरू नये यासाठी तो हटविण्याचे काम सुरू असून इमारतीमध्ये बचावकार्यातील जवानांना सुरक्षितपणे आत प्रवेश करून अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी समन्वयाने मोहीम सुरू करण्याचे नियोजन आहे. यातून निश्चितपणे आत अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सध्या ३ जेसीबी आणि पोकलेन तसेच डंपरच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
“घटनास्थळी चालू असलेल्या बचावकार्याच्या प्रत्येक घडामोडीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. इमारत एका बाजूने झुकली असल्याने आणि इमारतीचे बांधकाम एका बाजूने ढासळले असल्याने अडचणी येत आहेत. एका बाजूचा मलबा हटविल्यानंतर इमारतीचा जो अस्थिर भाग आहे तो स्थिर झाल्यानंतर आतमध्ये जवानांना प्रवेश करण्यासाठी पुरेसा सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याची कार्यवाही केली जाईल. या बचावकार्यात सहभागी असलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी घटनास्थळाची सद्यस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा विचार करून बचावकार्याची योजना बनवली असून अडकलेले नागरिक सुखरुप बाहेर काढले जातील असा विश्वास आहे”.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
