पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…तळवडे रोडवरील रुपीनगर परिसरातील एका ऑटो गॅरेजमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसीफ अल्लाउद्दीन राईन (वय २२, व्यवसाय – कार मेकॅनिक, साईनाथनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ८ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास तळवडे रोडवरील राज ऑटो गॅरेज, रुपीनगर येथे घडली.
या प्रकरणात इखान, शकील आणि मिथुन (पूर्ण नावे व पत्ता अपूर्ण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्यांचा भाऊ हे राज ऑटो गॅरेजमध्ये गेले असता, “तू माझ्या वडिलांना शिवीगाळ का केलीस?” असा जाब आरोपींना विचारला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आरोपी इखान याने कोयत्याने फिर्यादीच्या कपाळाच्या डाव्या बाजूस व डोक्यावर वार करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
