४ जणांची सुखरूप सुटका; एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….सततच्या अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपो येथे मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. कचऱ्याच्या डोंगराचे अचानक भूस्खलन होऊन तो थेट महापालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय तीन मजली इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत इमारतीखाली अंदाजे १९ कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्री आणि विशेष पथकांची मदत घेतली जात आहे.
बचावकार्यादरम्यान आतापर्यंत चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याचा आढावा घेतला. बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे मोशी कचरा डेपोतील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
