पुणे (ता.मावळ) ……तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. इंदोरी येथील ठाकरवस्तीमध्ये शनिवारी (२८ जून) रात्री गाण्याचा आवाज मोठा असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महेश शंकर शिंदे (वय ३१) यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, कानाला, मानेला व हाताला दुखापत झाली असून डाव्या कानातून रक्तस्त्राव झाला. पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपीच्या पत्नीने शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पंचतंत्री हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने वासुदेव जोशी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
सोमाटणे फाट्यावर दोन जणांकडून देशी पिस्तुले जप्त
तळेगाव दाभाडे पोलीस व गुन्हे शाखा युनिट-२ यांनी सोमाटणे फाटा परिसरात कारवाई करत दोन जणांना अटक केली. पप्पू उर्फ विनोद राकेश पवार (वय २६) व रोहन सिताराम सावंत (वय २४, दोघेही दत्तनगर, चिंचवड) यांच्याकडून प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.