वाईन शॉप मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी, दि. १९ जून २०२६ – चिंचवड स्टेशन चौक परिसरात चायनीज गाडा लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणासह त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी वाईन शॉप मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण केसबलाल बुडा (वय १९) हे १७ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चिंचवड स्टेशन चौकातील विकी वाईनसमोर आपला चायनीज गाडा बंद करून आवराआवर करत होते. त्यावेळी विकी वाईनचे मालक पुरुषोत्तम दासानी, त्यांचा पुतण्या राहुल खेमचंद दासानी (वय २८), तसेच दुकानातील कामगार सौरभ संतोष सिंग (वय २८) आणि सुमित रमेश थोरात (वय २३) हे तेथे आले.
चायनीज गाडा दुकानासमोर का लावला, यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी सौरभ सिंग आणि सुमित थोरात यांनी बीयरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात फोडून फुटलेल्या बाटलीने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तर राहुल दासानी याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेत फिर्यादीचा भाऊ दिपक बुडा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली. फुटलेल्या बाटलीने, दगडांनी आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करून त्याला जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीचा मित्र महानीत बाला यालाही दगड मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १८ जून रोजी पहाटे ४.३५ वाजता नोंदविण्यात आला.
दरम्यान, आरोपी राहुल दासानी, सौरभ सिंग आणि सुमित थोरात यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.