पिंपरी, दि. १२ जून २०२६ – पिंपरी रेल्वे स्टेशनजवळील भारतनगर परिसरात एका तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल फोन व रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोहीद मुन्ना शेख (वय २२, रा. तथागत हौसिंग सोसायटी, डिलक्स चौकाजवळ, पिंपरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना दि. ९ जून २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्टेशनजवळील भारतनगर सार्वजनिक शौचालयाजवळ घडली.
या प्रकरणी यश चंद कांबळे (वय २०), सुदर्शन थोरात आणि शिव पवार, सर्व रा. भारतनगर, पिंपरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी यश कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडे “काम आहे” असे सांगून पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन तसेच ७०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.