पिंपरी, दि. १० जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरात संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. तसेच वायसीएम रुग्णालयातील पाणीपुरवठा पंप, विद्युत व्यवस्था देखभाल, नवीन भोसरी, यमुनानगर व थेरगाव रुग्णालयांतील स्वच्छता आणि वैद्यकीय उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य खरेदी, विविध विभागांसाठी प्रिंटर टोनर्स खरेदी, तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी आवश्यक पदे मानधन तत्त्वावर भरण्यास मंजुरी देण्यात आली.
शहरातील विविध भागांमध्ये जलनिस्सारण नलिकांची देखभाल, दुरुस्ती आणि नवीन नलिका टाकण्याच्या कामांना हिरवा कंदील देण्यात आला. थेरगाव, गांधीनगर, चिखली, तळवडे, पिंपळे सौदागर, रहाटणी, जुनी सांगवी आणि संत तुकाराम नगर परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे.
याशिवाय बीआरटीएस मार्गावरील पावसाळी नलिकांची साफसफाई, पुणे-आळंदी रस्त्यावरील रेलिंग व रोड फर्निचरची कामे, तसेच नाशिक फाटा-मोशी महामार्ग, एमडीआर-३१ आणि इतर प्रमुख रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
दापोडी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे चालन व देखभाल, महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, शून्य कचरा प्रकल्प, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील कर्मचाऱ्यांचे मानधन तसेच तळवडे बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी नवीन उच्चदाब वीजपुरवठा घेण्यासही मान्यता देण्यात आली.
“नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शहराच्या शाश्वत आणि लोकाभिमुख विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध असून मंजूर कामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.”
……स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
