एसआरए पात्र कुटुंबांना सदनिका मिळेपर्यंत भाडेभत्ता द्या; विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांच्या हिताचे संरक्षण करण्याची मागणी
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील दळवीनगर ते आनंदनगर या रेल्वेलगतच्या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे विभागाकडून ६ जून व ११ जून रोजी रेल्वे हद्दीतील जागा खाली करण्याची कारवाई होणार असल्याचे समजत असून, या पार्श्वभूमीवर बाधित रहिवाशांच्या हिताचे संरक्षण करून त्यांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या परिसरातील अनेक रहिवाशांना एसआरए प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थी म्हणून मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशा पात्र नागरिकांची सखोल व पारदर्शक पडताळणी करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पुनर्वसनासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबांना सदनिका उपलब्ध होईपर्यंत नियमानुसार भाडेकरार करून पर्यायी निवास व्यवस्था व दरमहा भाडेभत्ता देण्यात यावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रेल्वे विभाग, एसआरए आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी संयुक्तपणे पुनर्वसन प्रक्रिया राबवून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची स्पष्ट यादी जाहीर करावी. प्रत्यक्ष वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित ठेवू नये, तसेच अपात्र व्यक्तींना अनुचित लाभ मिळणार नाही याची खात्री करावी.
सध्या पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने प्रशासनाने मानवी संवेदनांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. योग्य पुनर्वसन, पर्यायी निवास व्यवस्था आणि भाडेभत्ता उपलब्ध होण्यापूर्वी कोणतेही कुटुंब बेघर होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना कारवाईमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही,शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही आणि त्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित राहतील याची खात्री करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दळवीनगर-आनंदनगर परिसरातील बाधित कुटुंबांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन सन्मानाने व नियमानुसार पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभाग, एसआरए आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने समन्वयाने काम करावे, अशी मागणी नागरिक व स्थानिक प्रतिनिधींनी केली आहे.
