एमआयडीसी भोसरी पोलिसांची उदगीरमध्ये धाडसी कारवाई; न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
पिंपरी-चिंचवड : मोशी परिसरातील अल्पवयीन मुलीला मारहाण, शिवीगाळ व छेडछाड केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या तपास पथकाने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून अटक केली आहे. आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोशी येथे अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिची छेडछाड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी समीर केदारनाथ शिंदे (रा. लक्ष्मीनगर, मोशी, पुणे) याच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७२/२०२६ नोंद करण्यात आला होता. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८(२), ३५२, ११५(२), ३२४ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) अधिनियमाच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून आरोपीच्या हालचालींची माहिती मिळवली. आरोपी आपल्या मूळ गावी गुरदाळ (ता. उदगीर, जि. लातूर) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तत्काळ उदगीर गाठले.
उदगीर पोलीस ठाण्याच्या मदतीने सापळा रचून आरोपी समीर शिंदे याला उदगीर बस डेपो परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तो कर्नाटकात जाण्यासाठी निघाला असताना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील शेलार, सुहास कोंडेदेशमुख, स्वप्नील झनकर आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश खडसे करीत आहेत.