ईश्वरपूर : नेर्ले गावातील दोन तरुणांना कथितपणे पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे याचिका दाखल करण्यात आली आहे. ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी २१ मे २०२६ रोजी ही याचिका दाखल केली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
तक्रारीनुसार, ९ मे २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.३० च्या सुमारास नेर्ले येथील प्रणव ऊर्फ अवधूत धनाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील हे दोघे शेतातील नदीवरील पाण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी बहे येथील कृष्णा नदी पुलाजवळ वायरमनची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, संबंधितांनी दोघांना सिमेंटच्या रस्त्यावरून फरफटत नेले, कपडे फाडून नग्न केले आणि स्वतःला ईश्वरपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस असल्याचे सांगितले. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना उपचारासाठी ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात पोलीस कर्मचारी कुबेर खोत, अमोल सावंत, दीपक गस्ते आणि शशिकांत शिंदे यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अपयशी ठरत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
ही घटना मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून संबंधित पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एम. डी. चौधरी यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
या प्रकरणात नेर्लेचे सरपंच संजय जयसिंग पाटील, कायदे सल्लागार संतोष कदम, जिल्हा निरीक्षक मोहन पाटील, तालुका अध्यक्ष सुभाष पाटील तसेच गोरख पल्ले आणि सुहास पाटील यांनी सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.
