धनंजय भालेकर यांनी पदाधिकारी समवेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट
पिंपरी-चिंचवड : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जागेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी धनंजय भालेकर यांनी विलास लांडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेच्या १६ जागांपैकी दोन जागा लढवण्याची तयारी दर्शवली असून, रायगड-रत्नागिरी आणि पुणे या मतदारसंघांवर पक्षाचा विशेष आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जागेसाठी माजी आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
दरम्यान, महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
दुसरीकडे, सोलापूर विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीत बॅलेट पेपरवर पसंतीक्रमानुसार मतदान होणार आहे. काँग्रेसनेही सोलापूरची जागा लढवावी, अशी मागणी प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असले तरी भाजपही या जागेसाठी आग्रही असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतरच जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
