ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि गणेशपुरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने गणेशपुरी हद्दीतील एका क्लिष्ट खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मृताचा सख्खा भाऊच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ मे २०२६ रोजी नरेश टोलाराम पाटील (वय ३७, रा. शेडगाव, ता. भिवंडी) यांनी त्यांचा भाऊ परेश टोलाराम पाटील (वय ४०) याचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची फिर्याद गणेशपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परेश पाटील हे युनिकॉर्न दुचाकीवरून वसई येथे कामावर जात असताना शेडगाव फाट्याजवळील मोरीजवळ त्यांच्या डोक्यावर व हनुवटीवर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
या गंभीर घटनेची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी विशेष पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व गणेशपुरी पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर राकेश भगवान पाटील (वय ३७), प्रेमजीत मधुकर घरत (वय ३८) आणि दक्षत भानुकांत भोईर (वय २४, सर्व रा. केळवा, पालघर) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर तपासात फिर्यादी नरेश पाटील यानेच आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्यासाठी सुपारी दिल्याचे उघड झाले. आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे हा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाय तसेच विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास गणेशपुरी पोलीस करत आहेत.
