लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पोस्ट व्हायरल
पिंपरी-चिंचवड | दि. १६ मे २०२६ : रावेत परिसरात शुक्रवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. रात्री सुमारे ९.२४ वाजण्याच्या सुमारास रावेत येथील ए. जे. फर्निचर मॉलवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मॉलच्या काचा आणि नावाच्या प्लेटवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले आहेत. तसेच घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन आरोपी गोळीबार करताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारल्याचे समोर आले आहे. संबंधित पोस्टमध्ये ए. जे. फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर अंमली पदार्थ आणि हवाला व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच, “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात घालू,” अशी धमकीही देण्यात आली आहे.
याशिवाय, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिष्णोई याच्या नावाने एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, “जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आणि आमची लवकरच भेट होईल,” असा इशारा त्या क्लिपमध्ये दिल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांकडून संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
