उपमहापौर शर्मिला बाबर यांची प्रशासनाकडे मागणी; पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पर्यायी जागेची पाहणी करण्याची सूचना
पिंपरी, दि. २७ नोव्हेंबर : निगडी प्राधिकरण परिसरातील दुर्गादेवी टेकडीवरील २२७ झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेऊन वृक्षतोडीच्या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा केली. पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते का, याची तपासणी करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
त्यांनी मांडली.
दुर्गादेवी टेकडी हा निगडी प्राधिकरण परिसरातील महत्त्वाचा हरित पट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा विकसित झाली आहे. स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच निसर्गप्रेमी नागरिकांसाठी हा परिसर व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथील २२७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक प्रकल्प उभारणे महत्त्वाचे आहे. मात्र, विकासकामांच्या नावाखाली शहरातील हिरवळ आणि नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ नये, याचीही दक्षता घेणे आवश्यक असल्याचे बाबर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यासाठी उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे दुर्गादेवी टेकडी परिसराची पाहणी करावी. प्रस्तावित प्रकल्पासाठी टेकडी परिसरातील किंवा शहरातील अन्य उपलब्ध जागांचा पर्याय तपासावा. तसेच वृक्षतोडीची नेमकी आवश्यकता, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि पर्यायी जागांची व्यवहार्यता यांचा सविस्तर अभ्यास करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दुर्गादेवी टेकडीच्या संरक्षणाबाबत नागरिकांकडून व्यक्त होणाऱ्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा सुविधांचा विकास आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही बाबींचा समतोल राखून प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
