पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध पोलीस ठाण्यांमध्ये मारहाण, गंभीर दुखापत, आर्थिक फसवणूक, अपघात, वाहनचोरी, जुगार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
१. कोरेगाव खुर्द येथे लाकडी दांडक्याने मारहाण; एकाचा हात फ्रॅक्चर
उत्तर महाळुंगे……पहिल्या पत्नीने आई व दोन अनोळखी पुरुषांसह येऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना कोरेगाव खुर्द येथे घडली. दोन अनोळखी पुरुषांनी लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादीचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून डोक्यालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल.
२. रिक्षाचालकांच्या वादातून लोखंडी कडव्याने मारहाण
संत तुकारामनगर …..मोरवाडी रोडवरील मुलचंद मिल पार्किंगसमोर प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी रिक्षाचालक निकेश पारडे यांना लोखंडी कडव्याने मारहाण केली. शिवीगाळ करून रिक्षा पलटी करण्याची धमकीही दिली.
३. चिकन दुकानाच्या वादातून हॉटेल व्यावसायिकावर हल्ला
बावधन …..सुसगाव येथील हॉटेलमध्ये चिकन दुकान भाड्याने घेण्याच्या कारणावरून दोघांनी हॉटेल व्यावसायिक निखिल घोटणे यांना मारहाण केली. लोखंडी हत्याराने नाकावर व डाव्या डोळ्याजवळ वार करून जखमी केले. स्टीलच्या डब्याच्या झाकणानेही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
४. पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १ कोटी ३७ लाखांची फसवणूक
पिंपरी प्रतिनिधी…..पुणे महानगरपालिकेत ओळख असल्याचे सांगून बेरोजगारांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. बनावट नियुक्तीपत्रे आणि महापालिकेच्या शिक्क्यांचा वापर करून फिर्यादीसह इतरांची तब्बल १ कोटी ३७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजेंद्र पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल.
५. दुचाकीच्या अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
चिखली ……कुदळवाडी ब्रिज परिसरात दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात कुलदीप गौतम (वय १८) याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर त्याचा मित्र सागर परिहार जखमी झाला.
६. टेम्पोच्या धडकेत कॅबचे नुकसान
हिंजवडी.….हिंजवडी फेज-१ येथील आयस्कोर आयटी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर पार्क केलेल्या कॅबला टेम्पो ट्रॅव्हल्सने धडक दिली. या अपघातात कॅबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक विशाल शेडगे यांनाही दुखापत झाली.
७. टाटा मोटर्ससमोरील पार्किंगमधून दुचाकी चोरी
एमआयडीसी भोसरी ….टाटा मोटर्स गेटसमोरील पार्किंगमध्ये लॉक करून ठेवलेली ४० हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
८. नेहरूनगरमध्ये कल्याण मटका जुगारावर कारवाई
संत तुकारामनगर.…नेहरूनगर येथे कल्याण मटका जुगार खेळविणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून १ हजार ९४० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
९. सांगवीत तरुणाकडून कोयता जप्त
सांगवी प्रतिनिधी ….जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत अथर्व चव्हाण (वय २०) याच्याकडे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता आढळून आला. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
१०. सांगवीत विनापरवाना मद्यसाठा जप्त
सांगवी प्रतिनिधी……जुनी सांगवी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात सुरज कांबळे (वय २४) याच्याकडे देशी व विदेशी मद्याचा विनापरवाना साठा आढळून आला. पोलिसांनी ७ हजार ४० रुपयांचा मद्यसाठा जप्त करून गुन्हा दाखल केला.
