सफाई कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीला, महापालिकेच्या नियोजनाला अन् नागरिकांच्या सहभागाला राष्ट्रीय स्तरावर सलाम; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरव
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी… औद्योगिकनगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने आता स्वच्छतेच्या क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. देशातील पहिल्या पाच स्वच्छ शहरांच्या मानाच्या यादीत स्थान मिळवत पिंपरी-चिंचवडने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शहराचा गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबई, पाचगणी, पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि विटा या शहरांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडने मिळवलेले स्थान शहरवासीयांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. वाढते औद्योगिकीकरण, झपाट्याने विस्तारत असलेले नागरीकरण, लोकसंख्येचा वाढता भार आणि दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन अशा अनेक आव्हानांवर मात करत शहराने स्वच्छतेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
औद्योगिकनगरीची स्वच्छनगरीकडे दमदार झेप!
घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा स्वतंत्र संकलित करणे, कचऱ्याचे विलगीकरण, नियमित साफसफाई, पुनर्वापराला प्रोत्साहन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती यामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला बळ मिळाले आहे. याशिवाय आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
शहराच्या या यशामागे खरे शिल्पकार आहेत ते पहाटेपासून रस्त्यावर उतरून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे सफाई कर्मचारी! ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शहराच्या स्वच्छतेसाठी झटणारे कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान या यशात मोलाचे आहे.
महापालिकेचे नियोजन, स्वच्छता कर्मचाऱ्यांची मेहनत आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीमुळे पिंपरी-चिंचवडला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. हा गौरव केवळ महापालिकेचा नसून संपूर्ण शहराचा आणि प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराचा आहे.
राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे शहराच्या लौकिकात भर पडली असली, तरी हा दर्जा कायम राखण्याची जबाबदारी आता महापालिका प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, ओला-सुका कचरा वेगळा करणे आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होणे या बाबींची नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारल्यास पिंपरी-चिंचवडची स्वच्छतेतील घोडदौड निश्चितच कायम राहील
