महसूल विभागातील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकार्याची दखल; पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी……ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सेवानिवृत्त नायब तहसीलदार दिलीप मारुती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या आकुर्डी (पुणे) येथील मुख्य कार्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवाकार्याची आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दिलीप पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, नवीन कुर्ली येथील रहिवासी असून त्यांनी महसूल विभागात तब्बल ३२ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी ते निवासी नायब तहसीलदार अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी आदर्शवत कार्य केले. निवासी नायब तहसीलदार पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
त्यांच्या प्रशासकीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या आदर्श मंडळ अधिकारी पुरस्काराने, तसेच ‘कोकण रत्न’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग तलाठी संघाचे उपाध्यक्ष, कुर्ली उत्कृष्ट मंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कोविड महामारीच्या काळात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह स्वच्छता मिशनमध्येही सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक आणि कोकण विभागीय सचिव प्रणव बांदिवडेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
दिलीप पाटील यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक आणि विभागीय सचिव प्रणव बांदिवडेकर यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले.
या प्रसंगी कोकण विभागीय सचिव तथा एकदंत फूड अँड बेव्हरेजेसचे संचालक प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुकाध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊसचे संचालक महेंद्र चव्हाण आणि समीर सावंत उपस्थित होते.
दिलीप पाटील यांच्या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानवी हक्क संरक्षण, जनजागृती आणि सामाजिक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
