मोबाईल चार्जर चोरीच्या वादातून रिक्षाचालकासह भावाला मारहाण; एक आरोपी अटकेत, निगडी पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड : निगडीतील चिकन चौक परिसरात मोबाईल चार्जर चोरीच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भावांना मारहाण करून जखमी करण्यात आले असून, याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब हनीफ अन्सारी (वय ३६, व्यवसाय रिक्षाचालक, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१० वाजण्याच्या सुमारास चिकन चौक, निगडी येथे फिर्यादी आयुब अन्सारी, त्यांचा भाऊ सादाब आणि पत्नी नाझरीन हे गावाकडील काही लोकांसोबत सादाबचा नवीन मोबाईल चार्जर चोरीला गेल्याबाबत तसेच त्याला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून विचारणा करीत होते.
याचा राग आल्याने आरोपी मोहम्मद फैजान कलवा शाह याने फिर्यादी आयुब आणि त्यांचा भाऊ सादाब यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. तर दुसरा आरोपी विशाल शमीम शाह (वय २३) याने स्टीलच्या कड्याने सादाब याला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल अमेंडमेंट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद फैजान कलवा शाह याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे करीत आहेत.