भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे धाव; संशयास्पद फायली, निविदा आणि कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याविरोधातील लाचप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणासह महापालिकेच्या बीट मार्शल यंत्रणेसंदर्भातील तक्रारींचीही स्वतंत्र आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
२९ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाचप्रकरणी अटक केल्याची घटना समोर आल्याचा उल्लेख भोईर यांनी आपल्या निवेदनात केला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कारभारातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संशयास्पद फायली, निविदांची तपासणी करा!
मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा आणि विकासकामांची महापालिका स्तरावर उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. संबंधित कामांमध्ये काही अनियमितता आढळल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.
बीट मार्शलविरोधातील तक्रारींचाही छडा लावा
महापालिकेच्या बीट मार्शल यंत्रणेसंदर्भात गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असल्याचा दावा करत, या सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तक्रारींची सत्यता तपासून संबंधित प्रकरणांमधील वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
दोन्ही प्रकरणांत चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबनासह कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत; अन्यथा जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.महापालिका प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन चौकशीबाबत काय भूमिका घेतली, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
