निधीचा विनियोग करताना नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य; प्रशासकीय व आर्थिक मान्यतेसाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित
पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रभागस्तरावर स्थानिक, तातडीच्या आणि नागरी हिताच्या पायाभूत विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, निधीचा वापर करताना कामांचे महत्त्व, तातडी आणि नागरिकांना होणारा लाभ विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नगरसेवक स्वेच्छा निधीतून कामे सुचविताना एकत्रित मोठे काम, एकाच प्रभागातील विविध ठिकाणी लहान कामे किंवा बहुसदस्यीय प्रभागात एकत्रितपणे मोठे काम अशा पर्यायांचा विचार करता येणार आहे. संबंधित कामांसाठी अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी मंजूर असलेल्या निधीच्या मर्यादेतच खर्च करता येईल. एकापेक्षा अधिक नगरसेवकांना एकत्रित काम करावयाचे असल्यास निधीचे एकत्रीकरण सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करता येणार आहे.
प्रशासकीय व आर्थिक मान्यतेची कार्यपद्धती
नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक असेल. २५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांना नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची तरतूद आहे. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वमान्यता आवश्यक राहील. संबंधित विभागांनी विहित कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य
या निधीतून रस्ते, लहान पूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, गटारे, समाजमंदिरे, सार्वजनिक वाचनालये, प्राथमिक शाळांमधील आवश्यक दुरुस्ती, सार्वजनिक उपयोगाच्या सुविधा, उद्याने, मनपाच्या जागांवरील खेळणी व व्यायाम साहित्य, पादचारी सुविधा तसेच इतर आवश्यक नागरी कामे करता येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक शौचालये, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांचाही समावेश आहे.
मात्र, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलेल्या मर्यादेनुसार खासगी इमारतींची दुरुस्ती, अनधिकृत वस्त्यांमधील कामे, अनुदानित संस्थांची काही कामे, मोठ्या स्वरूपाची स्वतंत्र बांधकामे आणि स्वेच्छा निधीच्या उद्देशाशी सुसंगत नसलेली कामे या निधीतून करता येणार नाहीत. काही विशिष्ट कामांसाठी स्वतंत्र अटी व निर्बंधही नमूद करण्यात आले आहेत.
“नगरसेवक स्वेच्छा निधीतील कामे सुचविताना संबंधित नगरसेवकांची लेखी शिफारस, आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यता आणि विहित कार्यपद्धतीचे पालन करणे आवश्यक राहील. शासन निर्णय व परिपत्रकातील तरतुदींनुसार निधीचा विनियोग करून नागरी सुविधांशी संबंधित कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी”
…..आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
