पारंपरिक वाद्ये, लोकसंगीत आणि शौर्यपरंपरेने अभिजात मराठी भाषा सप्ताह रंगला
पिंपरी, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्राच्या मातीचा गंध, समृद्ध लोकपरंपरांचा वारसा, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि मराठी अस्मितेचा बुलंद हुंकार अशा चैतन्यमय वातावरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत सादर झालेल्या ‘फोक महाराष्ट्र’ या कार्यक्रमाने रसिकांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची अनोखी सफर घडवली. संबळाचा घनगंभीर नाद, हलगीचा कडकडाट, घुंगरांचा झंकार आणि लोकगीतांच्या सुरांनी प्रेक्षागृह दुमदुमून गेले.
अभिजात मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘फोक महाराष्ट्र’मधून पारंपरिक गायन, वादन आणि नृत्य यांच्या सुरेख मेळातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील श्रद्धा, परंपरा आणि कलात्मक अभिव्यक्तीचे दर्शन घडले. गावोगावच्या जत्रा, उत्सव, धार्मिक सोहळे आणि सामूहिक लोकजीवनातून विकसित झालेल्या लोककलांनी मराठी समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत दिलेले योगदानही या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
‘शिवाजी राजा आला र माझा’च्या गजरात शौर्यपरंपरेचा जागर
महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. ‘शिवाजी राजा आला र माझा’ या गीताच्या जोशपूर्ण सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जयघोष करण्यात आला. स्वराज्याची प्रेरणा, मावळ्यांची निष्ठा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाव या सादरीकरणातून प्रभावीपणे व्यक्त झाला.
‘आम्ही गड्या डोंगरचे राहणार… चाकर शिवबाचे होणार’ या गीताने सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून घडलेल्या शौर्यपरंपरेच्या स्मृती जागवल्या. बुलंद स्वर, ठसकेबाज लय आणि कलाकारांच्या आवेशपूर्ण सादरीकरणामुळे वातावरणात उत्साह संचारला. इतिहासाचे स्मरण आणि लोककलेचा आविष्कार यांचा संगम या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले.
संबळ, हलगी आणि ताशाच्या निनादाने प्रेक्षागृह दुमदुमले
‘फोक महाराष्ट्र’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्यांचे सामर्थ्यपूर्ण सादरीकरण. संबळ, ताशा, हलगी, ढोल, ढोलकी, बासरी, हार्मोनियम, टाळ, झांज, घुंगरू, गजढोल, डफ, चंडा आणि शहनाई अशा विविध वाद्यांच्या साथीने लोकसंगीताचा बहुरंगी आविष्कार साकार झाला.
हलगीचा कडकडाट, संबळाचे घनगंभीर स्वर, ताशाचा जोशपूर्ण निनाद आणि घुंगरांचा लयबद्ध झंकार यामुळे कार्यक्रमातील उत्साह द्विगुणित झाला. कलाकारांमधील तालमेळ आणि वाद्यांची पूरक साथ यामुळे लोकसंगीतातील जिवंतपणा रसिकांना अनुभवता आला.
‘घाटोळी’पासून ‘गाडी घुंगराची’पर्यंत लोकपरंपरांचे रंग
महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाते सांगणाऱ्या ‘घाटोळी’ आणि ‘गाडी घुंगराची’ यांसारख्या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पारंपरिक लोकसंगीतातील ठेका, गीतांमधील सहजता आणि कलाकारांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.
गायन, वादन आणि नृत्य यांच्या सुरेख मेळातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरांमधील विविधता आणि वैशिष्ट्ये प्रभावीपणे समोर आली. लोककलेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला अभिवादन करणारा हा कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताहातील संस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरला.
लोकसंस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, पारंपरिक कलाप्रकारांचे जतन करणे आणि मराठी भाषेच्या सांस्कृतिक मुळांशी नव्या पिढीचे नाते दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश अधोरेखित झाला.
मंगळवार, दि. ६ ऑक्टोबरचे कार्यक्रम
•प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
•सकाळी १० वाजता – ‘कॉर्पोरेट कबुतर’ एकांकिका
•दुपारी १२.३० वाजता – ‘ऑल दि बेस्ट’ नाटक
•सायंकाळी ५.३० वाजता – ‘वरवरचे वधूवर’ नाटक
•रात्री ९.३० वाजता – ‘सूर वेली’ सांगीतिक प्रवास
नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी
•सकाळी ९ वाजता – महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ जादुई बालनाट्य
•सायंकाळी ५ वाजता – ‘सदाबहार अजय-अतुल’ सांगीतिक कार्यक्रम
•रात्री ९ वाजता – कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कवितांवर आधारित ‘स्वर – शांता’
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी
•सकाळी ८.१५ वाजता – बालगीतांचा कार्यक्रम
•सकाळी ९ वाजता – ‘ग्रीझीच्या गुहेत चिंटुची धमाल’ बालनाट्य
•दुपारी १२ वाजता – ‘गंध मराठी कलेचा’
