१४ वर्षे मुलांच्या गटात १४८ संघांचा सहभाग; आशियाई सुवर्णपदक विजेती पृशिका प्रदीपची विशेष उपस्थिती
पिंपरी, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय खो-खो स्पर्धा २०२६ चा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. ५) उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या गटात तब्बल १४८ संघांनी सहभाग नोंदविला आहे.
उद्घाटन सोहळ्यास जपान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत आर्चरी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविणारी पृशिका प्रदीप हिची विशेष उपस्थिती होती. तसेच पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) पंकज पाटील, पृशिकाचे प्रशिक्षक कुणाल तावरे, इंग्लिश मीडियम स्कूल एस.एस.पी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस.बी. पाटील, सहसंचालक सुनील शेवाळे, क्रीडा अधिकारी दीपक कन्हेरे, क्रीडा मार्गदर्शक सिरीन गोडबोले, निवृत्ती काळभोर, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस, सुनीता पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार कटके यांनी केले, तर रवींद्र गारगोटे यांनी आभार मानले.
१४ वर्षे मुलांच्या गटातील सामन्यांमध्ये भोसरी संघाने एम.एस.एस. हायस्कूल, चिंचवडचा १०-२ असा पराभव करून विजय मिळविला. श्रमिक नगर क्रमांक ९४ संघाने स्वामी समर्थ सीबीएसई संघावर ८-५ अशी मात केली. तसेच गुरु गणेश संघाने विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल संघावर विजय मिळविला.
शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडांगणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
