भोसरी परिसरातून ताब्यात; बांगलादेशात हद्दपारीची प्रक्रिया सुरू
पिंपरी-चिंचवड, दि. १९ सप्टेंबर २०२६ : भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचा संशय असलेल्या एका बांगलादेशी महिलेला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) ताब्यात घेतले. तिच्याकडे आढळून आलेले आधारकार्ड बनावट असल्याचे पोलिसांच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी गोविंद गार्डन शेजारील परिसरात एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती ATBला मिळाली होती. त्यानुसार परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी डायमंड लॉज येथे लवली रोविंदर जाट या नावाने वास्तव्यास असलेली महिला पोलिसांना आढळून आली.
तिच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली असता आधारकार्ड बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत तिने आपले बांगलादेशी नाव लवली मो. अबु बकर सिध्दीक शेख (वय २९) असून, ती बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेने सुमारे दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे चौकशीत सांगितले. सध्या ती मध्य प्रदेशातील इंदूर येथे रोविंदर जाट नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचेही तिने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून बांगलादेशातील तिच्या मुलासह आई व इतर नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित महिलेला भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. परकीय नागरिक नोंदणी शाखेच्या माध्यमातून तिला बांगलादेशात परत पाठविण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया विशेष शाखेमार्फत सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या दि. २ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही करण्यात येत आहे.
दि. २ मे २०२५ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ATBने अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एकूण ३० बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापैकी २६ जणांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले असून, आणखी चार जणांविरुद्ध हद्दपारीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने केली.
