पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात दिल्लीला पसार झालेला मुख्य आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात
पिंपरी चिंचवड : अवघ्या दोन हजार रुपयांसाठी एका इसमाचा खून करून त्याचे हात-पाय बांधले, पायाला दगड बांधला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुळशी तालुक्यातील दुधाळे वस्ती येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखा, युनिट-२ आणि गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी तब्बल दिल्लीपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी गोपाल ऊर्फ राज साधोन बिस्वास (वय २०), सध्या रा. मुर्गा मंडीसमोरील ब्रिजखाली, गाझीपूर, दिल्ली, मूळ रा. बीबीपुली, ता. बारासात, जि. उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘बाहेर जाऊन येतो’ म्हणत घराबाहेर पडला अन् बेपत्ता
दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास मुळशी तालुक्यातील दुधाळे वस्ती येथील एक इसम ‘बाहेर जाऊन येतो’ असे सांगून घराबाहेर पडला. मात्र तो पुन्हा घरी परतलाच नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अथवा फूस लावून त्याला पळवून नेल्याच्या संशयावरून बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६, बीएनएस कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांकडून बेपत्ता इसमाचा युद्धपातळीवर शोध सुरू असतानाच दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुधाळे वस्ती येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या हात-पायांना बांधलेले होते तसेच पायाला दगड बांधण्यात आला होता. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर गुन्ह्यात बीएनएस कलम १०३ (१) व २३८ वाढ करण्यात आले.
सीसीटीव्हीची तपासणी, मात्र आरोपींचा मागमूस नाही
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व गुन्हे शाखांना हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. गुन्हे शाखा युनिट-२ आणि गुंडा विरोधी पथकाची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
घटनास्थळ ग्रामीण भागात असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. मयत व्यक्ती रविवारी पिरंगुट येथील बाजारात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच दारू पिण्याच्या वादातून खून झाला असण्याची शक्यता गृहीत धरून परिसरातील दारू दुकानांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. मात्र सुरुवातीला पोलिसांच्या हाती ठोस धागा लागत नव्हता.
तांत्रिक तपासाने दिला ‘दिल्ली’चा धागा
एकीकडे पारंपरिक तपास सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. मयत इसमाच्या खुनामागे गाझीपूर, दिल्ली येथील दोन मजूर इसमांचा सहभाग असल्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला. खून केल्यानंतर आरोपी दिल्लीला पसार झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले.यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता दिल्लीच्या दिशेने पथक रवाना केले.मोबाईल नाही, ठराविक घर नाही; तरीही पोलिसांनी शोधून काढले.
पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश मेदगे, पोलीस हवालदार विजय गंभीरे आणि पोलीस शिपाई प्रशांत सैद यांचे पथक दिल्लीला रवाना झाले.
आरोपी कचरा वेचण्याचे तसेच मिळेल ते मजुरीचे काम करत असल्याने त्याचा कोणताही ठराविक पत्ता नव्हता. त्यातच तो मोबाईल फोनचा वापर करत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र पोलिसांनी तब्बल तीन दिवस पारंपरिक पद्धतीने तपास, माहिती संकलन आणि सापळा रचत आरोपीचा माग काढला.
अखेर मुर्गा मंडी, गाझीपूर, दिल्ली येथे सापळा रचून मुख्य आरोपी गोपाल ऊर्फ राज साधोन बिस्वास याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे दोन हजार रुपयांच्या किरकोळ रकमेवरून झालेल्या कथित खुनाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, या गुन्ह्यातील अन्य आरोपींची भूमिका आणि खुनामागील नेमका घटनाक्रम याबाबत पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, समीर लोंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश मेदगे, नितीन ढोरजे, संदिप गवारी, तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी व अंमलदारांनी या तपासात सहभाग घेतला.
तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश माळी, पोलीस हवालदार प्रकाश ननावरे, काशीनाथ शेकापुरे आणि पोलीस शिपाई रमेश कारके, पंकज जाधव यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
