महापौर रवि लांडगे यांची विसर्जन घाटांवर धडक पाहणी; सुरक्षा, स्वच्छता व सुविधांबाबत अधिकाऱ्यांना कडक निर्देश
पिंपरी, प्रतिनिधी : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन घाटांवरील तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांची संयुक्त पाहणी केली. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता स्वच्छता, सुरक्षा आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, तसेच मनुष्यबळ आणि यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवाव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
“गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडणे आवश्यक आहे. प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
विसर्जन घाटांवर स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, निर्माल्य संकलन, दिशादर्शक फलक, कृत्रिम विसर्जन हौद आणि सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक अथवा प्रवेश-निर्गमन व्यवस्थेत अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले.
घाट परिसरात चिखल, घसरडेपणा आणि पाणी साचणे टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून विसर्जनाच्या दिवशीही घाट परिसराची सातत्याने स्वच्छता करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
निर्माल्य नदीपात्रात जाणार नाही याची दक्षता
निर्माल्य अथवा पूजासाहित्य नदीपात्रात किंवा इतर जलस्रोतांमध्ये जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. निर्माल्यकुंडांची योग्य ठिकाणी व्यवस्था करून त्याबाबत ठळक दिशादर्शक फलक लावावेत, तसेच विसर्जनस्थळी निर्माण होणारा कचरा तातडीने संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असेही सांगण्यात आले.
नागरिकांनी निर्माल्य आणि पूजासाहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.
कृत्रिम हौदांचा वापर करण्याचे आवाहन
लहान गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच स्वच्छ पाण्यात करावे. नदी, नाले व इतर जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि ‘स्वच्छ, सुंदर पिंपरी-चिंचवड’ घडविण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.विसर्जन घाटांवरील सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश देताना आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही यंत्रणा, जीवनरक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी सातत्यपूर्ण समन्वय राखावा तसेच भाविकांना विसर्जन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी दिशादर्शक व स्थलदर्शक फलक ठळकपणे लावावेत, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
विभागीय समन्वयातून विसर्जन व्यवस्था सुरळीत करण्याचे आयुक्तांचे निर्देश
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही विसर्जन व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता, आवश्यक डागडुजी, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यास सांगण्यात आले.
घाट परिसरातील विद्युत तारा, जोडण्या आणि विद्युत उपकरणांची सुरक्षितता तपासून कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
विसर्जनाच्या दिवशी वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व सुविधा वेळेत उपलब्ध आहेत, याची खात्री करावी. घाट, विसर्जन मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता सातत्याने राखावी. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने समन्वय साधून कार्यवाही करावी, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
शहरातील प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी
महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत सुभाष घाट-पिंपरी, अहिल्यादेवी होळकर घाट, वेताळ महाराज घाट, सांगवी, वाकड गावठाण घाट, चिंचवड येथील थेरगाव पूल घाट, जाधववाडी घाट-रावेत, इंद्रायणी नदी घाट तसेच मोशी खाण या प्रमुख विसर्जनस्थळांची संयुक्त पाहणी केली.
सुभाष घाट येथे ‘ड’ प्रभाग अध्यक्षा तथा नगरसदस्या सविता खुळे, नगरसदस्या प्रियंका कुदळे, निकिता कदम उपस्थित होत्या. अहिल्यादेवी होळकर घाट व वेताळ महाराज घाट परिसरात ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग अध्यक्षा तथा नगरसदस्या तृप्ती कांबळे उपस्थित होत्या.
वाकड घाट परिसरात ‘ज’ क्षेत्रीय प्रभाग अध्यक्षा तथा नगरसदस्या आरती चोंधे, नगरसदस्या रेश्मा भुजबळ, नगरसदस्य राहुल कलाटे व माजी नगरसदस्य राम वाकडकर उपस्थित होते.
चिंचवड येथील थेरगाव पूल घाट परिसरात विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे, ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, शेखर अण्णा चिंचवडे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.
जाधववाडी घाट, रावेत परिसराच्या पाहणीदरम्यान नगरसदस्या ऐश्वर्या तरस व नगरसदस्य राजेंद्र तरस आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, सहायक आयुक्त तानाजी नरळे, सहशहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सोहम निकम, जहिरा मोमीन, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
