शाडू मातीच्या गणेशमूर्तींतून ‘हरित गणेशोत्सवा’चा संदेश; थेरगावात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या उत्साहाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानांतर्गत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २३ मधील यशवंतराव चव्हाण विद्यालय, थेरगाव येथे ही कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू माती आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारल्या. गणेशमूर्ती निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गणेशोत्सवात सजावटीसाठी कागद, कापड, बांबू, पाने, नैसर्गिक फुले तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर थर्माकोल आणि एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी बोलताना उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि उत्साहाचा सण आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही आपली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक सजावट आणि प्लास्टिकमुक्त उत्सवाचा संदेश घराघरांत पोहोचण्यास मदत होईल. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पुढील पिढीवरही होईल.”
या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची त्यांची तयारी विशेष ठरली.
यावेळी सहायक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गोपाल धस, आरोग्य सहाय्यक सचिन उघडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
