पिंपरी-चिंचवड, दि. २ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केला. शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच, या सभेत घेतलेल्या निर्णयांच्या वैधतेला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा बहल यांनी दिला.
योगेश बहल म्हणाले, “लोकांच्या हिताच्या विषयांमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, जिथे नियमांची पायमल्ली होत आहे, तिथे आम्ही पाठिंबा देणार नाही. अधिसूचनेनुसार सभेसाठी सात दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. २७ ऑगस्टला अजेंडा काढण्यात आला, तो २८ ऑगस्टला वेबसाईटवर आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत सात दिवस पूर्ण झालेले नाहीत. आज केवळ सहा दिवस झाले असून, त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर आहे,” असा दावा त्यांनी केला.
“अजेंड्यावरील सर्व विषय १७ सप्टेंबरच्या नियमित सभेत घेणे अपेक्षित होते. हे विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेत घेण्याचा अधिकार कोणी दिला? ही सभा शुक्रवारी का घेण्यात आली नाही? आम्ही न्यायालयात जाणार आहोत. नियमित सभेत केवळ तीन विषय घ्यावेत. प्रशासनाने दिलेला खुलासा अयोग्य आहे. वाचता एक आणि करता एक, अशी परिस्थिती आहे. १७ सप्टेंबरपर्यंत थांबा; मात्र चुकीच्या गोष्टीला आमचा पाठिंबा नाही,” असेही बहल यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही नियमांच्या पालनाची मागणी केली. “आमचा सभा उधळण्याचा कोणताही डाव नाही. मात्र, नियमांचे पालन झाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने नियमांनुसार काम करणे अपेक्षित आहे,” असे भोईर म्हणाले.
शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनीदेखील सभेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. “ही सभा अधिकृत असेल, तर आमचा पाठिंबा आहे. शहरातील विकासकामांचे निर्णय महत्त्वाचे आहेत. मात्र, प्रक्रिया नियमात बसत नसेल, तर आमचा पाठिंबा राहणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समितीच्या विषयांबाबत भूमिका स्पष्ट केली. “स्थायी समितीचे विषय नजीकच्या सभेत घेता येतात. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
मात्र, भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी विशेष सभा पूर्णपणे वैध असल्याचा दावा केला. “एमआरटी अधिनियमातील कलम ३५ नुसार ही सभा अधिकृत आहे. कलम ४४ नुसार सदस्यांना आक्षेप नोंदविण्याचा अधिकार आहे. ज्याला आक्षेप घ्यायचा असेल त्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी; मात्र विषयांवर हरकत घेऊन विकासकामांना अडथळा आणू नये. अधिनियमातील सर्व तरतुदींमध्ये आजचे विषय बसतात. या संदर्भात उच्च न्यायालयाचा दाखलाही आहे,” असे नढे यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनानेही सभेच्या वैधतेबाबत स्पष्टीकरण देताना तातडीची सभा घेण्याची अधिनियमात तरतूद असल्याचे सांगितले. नियमित मासिक सभेतील विषयांसह २० ऑगस्टच्या सभेतील विषयांवरही विशेष सभेत निर्णय घेता येऊ शकतो, त्यामुळे आजची सभा वैध असल्याची भूमिका प्रशासनाने मांडली.
विशेष सभेच्या कायदेशीर वैधतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार वादामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग करून न्यायालयात जाण्याची भूमिका घेतल्याने आजच्या विशेष सभेत घेतलेल्या निर्णयांच्या वैधतेचा मुद्दा आगामी काळात न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.