चिंचवड प्रतिनिधी…..मोशी येथील १५ हेक्टर जमीन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी वंचित, आदिवासी तसेच भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली तीन दशके केलेल्या अखंड समाजसाधनेला या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार आहे.
गुरुकुलमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबतच त्यांच्या पारंपरिक ज्ञान, कला-कौशल्ये आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याची संधी दिली जाते. सामाजिक समरसता, संस्कार आणि स्वावलंबन या मूल्यांवर आधारित शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो.
“मोशीतील १५ हेक्टर जमीन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला जागा देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सामाजिक विकासातील ऐतिहासिक टप्पा आहे. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी वंचित आदिवासी आणि भटक्या-विमुक्त समाजातील मुलांच्या विकासासाठी केलेल्या तीन तपांच्या अखंड समाजसाधनेला राज्य सरकारने या निर्णयातून भक्कम बळ दिले आहे.”
…… आमदार शंकर जगताप, चिंचवड,पुणे
विकासाची संकल्पना केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरती मर्यादित नसून समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षण, संस्कार, कौशल्य आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असेही आमदार जगताप यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या संकल्पनेला पुढे नेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला सामाजिक समरसता आणि मानवी विकासाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, आदिवासी, वंचित आणि भटक्या-विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यातील पारंपरिक ज्ञान, कला आणि कौशल्यांचे जतन व्हावे, या ध्येयातून त्यांची समाजसाधना सुरू आहे. गेली तीन दशके सहकारी, कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिकांच्या सहकार्याने ही वाटचाल सुरू असून, मोशीतील १५ हेक्टर जागेमुळे या कार्याचा विस्तार करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
या जागेवर शिक्षण, संस्कार, कौशल्य, संशोधन आणि स्वावलंबन यांची सांगड घालणारे सर्वांगीण विकास केंद्र उभारण्याचा संकल्प असल्याचे प्रभुणे यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.