मुंबई,दिं.३१ ऑगस्ट : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमबद्ध करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार भरतीची जाहिरात राष्ट्रीय तसेच ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गातील राज्यस्तरीय वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उमेदवारांना ऑनलाइनसोबतच ऑफलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शॉर्टलिस्टिंगसाठी यूजीसीच्या निकषांचा अवलंब करून त्याचे निकष व उमेदवारांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागणार आहे.
मुलाखत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी संपूर्ण मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले असून, हे रेकॉर्डिंग किमान एक वर्ष सुरक्षित ठेवावे लागणार आहे. तक्रार, चौकशी किंवा न्यायालयीन कार्यवाही सुरू असल्यास अंतिम निकाल होईपर्यंत रेकॉर्डिंग जतन करावे लागेल.
विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निवड यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेही बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेत अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित संस्था, अधिकारी अथवा समितीच्या सदस्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.