पुणे/रहाटणी : विश्वबंधुत्व दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे आयोजित देशव्यापी महा रक्तदान अभियानांतर्गत रहाटणी सेवा केंद्रात भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. शनिवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत झालेल्या या शिबिराला नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त २१ ते २५ ऑगस्टदरम्यान देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी या अभियानातून देशभरात एक लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. यंदाही एक लाख युनिट रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
रहाटणी येथील शिबिराचे आयोजन औंध जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, पुणे यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नगरसेविका अर्चनाताई विनोद तापकीर, प्रसिद्ध चिकित्सक डॉ. निशा तेली, रहाटणी केंद्राच्या प्रभारी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वर्षा दीदी, बी. के. अर्चना दीदी, बी. के. सुशीला दीदी व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी अर्चनाताई तापकीर यांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. केंद्र प्रभारी बी. के. वर्षा दीदी यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करताना, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपल्या एका युनिट रक्तामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी अर्चनाताई तापकीर आणि बी. के. सुशीला दीदी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र, अल्पोपहार व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. करुणा, सेवा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
