आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांची प्रमुख उपस्थिती; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी, दि. १५ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संत तुकाराम नगर परिसरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीला भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, सदाशिव खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, अजीजभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हातात तिरंगा घेत हजारो नागरिक, महिला, युवक, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. पंचशील बुद्ध विहार, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन, मैत्री चौक, जिरे टोपी चौक, महेश नगर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, आचार्य अत्रे सभागृह, वल्लभनगर, हुतात्मा चौक, साईबाबा मंदिर, शनी मंदिर चौक असा रॅलीचा मार्ग होता. त्यानंतर रॅलीचे श्रमिक आघाडीच्या कार्यालयात सभेत रूपांतर झाले.
महिलांचा लक्षणीय सहभाग…..
आमदार अमित गोरखे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशभक्तीचा उत्साह आणि भारतमातेविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. अनेक ज्येष्ठ महिलांनी वयाची तमा न बाळगता तब्बल पाच ते सहा किलोमीटर पायी चालत रॅलीत सहभाग घेतला. नागरिकांच्या सहभागातून देशप्रेमाची भावना प्रकर्षाने दिसून आली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण व्हावे…..
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये ही भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण नव्या पिढीला व्हावे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव तरुणांमध्ये निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था तसेच स्थानिक मंडळे आणि विविध कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले. महिला, युवक, कामगार, श्रमिक आणि स्थानिक नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली, असे भोसले यांनी सांगितले.
रॅलीनंतर झालेल्या सभेत उपस्थितांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा संदेश दिला. यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीचे नागरिकांनी कौतुक केले. रॅलीमुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यकर्त्यांचे नियोजन…..
या तिरंगा रॅलीचे संयोजन मंडल अध्यक्ष मंगेशजी धाडगे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली थोरात, नंदू आप्पा कदम, किरण सुवर्ण, जयदेव अक्कलकोटे, मुन्ना बाविस्कर, उद्योजक दीपक शेठ पाटील, दिनेश पाटील, राहुल शितोळे, दत्ता गायकवाड, अमोल घोरपडे, राहुल खाडे, संतोष दुबे, विजय दळवी, मनिष अमोलिक, प्रभजोत सिंगहंस आदींनी केले.