पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी (दि. २५ जुलै २०२६): समाजाच्या हितासाठी स्वतःला समाजासाठी वाहून देणाऱ्या कासारवाडीचे सुपुत्र, समाजसेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व कामगार भूषण पैलवान काळुराम लांडगे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
शाहूनगर येथील आमदार अमित गोरखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार २०२६’ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, राजकीय, आरोग्य, उद्योग आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एकूण २२ मान्यवरांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे यांनी केले. सुनीता लोखंडे यांनी प्रास्ताविक तर लतींद्र भिंगारे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी आमदार अमित गोरखे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पुरस्कारार्थी, त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
