हिंजवडी (प्रतिनिधी): हिंजवडी परिसरातील मारुंजी येथील रॅम्बो पीजीसमोर एका युवकावर लाकडी काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २५ जुलै रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशन सचिन गायकवाड (वय २१, रा. रॅम्बो पीजी, शिंदेवस्ती, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ रा. सटाणा, जि. नाशिक) हे मित्रासोबत मोबाईलवर बोलत उभे असताना आरोपी आकाश सतीश सुरवसे (वय २१, रा. डांगे चौक, थेरगाव) व विष्णुकांत दयानंद अंधारे (वय २५, रा. रॅम्बो पीजी, शिंदेवस्ती, मारुंजी) यांनी विनाकारण शिवीगाळ केली.
फिर्यादी यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारताच आरोपी संतापले. त्यानंतर आकाश सुरवसे याने लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली, तर विष्णुकांत अंधारे याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.