पिंपरी-चिंचवड, दि. १६ जुलै : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी व भरीव आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या या आंदोलनाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष वेधले. आंदोलकांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोशी दुर्घटनेस प्रशासनाच्या निष्काळजीपणालाच जबाबदार धरले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी दालनात न येत पळ काढल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी “पळपुटा आयुक्त” अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना चेतन पवार यांनी सांगितले की, मोशी कचरा डेपो प्रकल्पाची मुदत संपल्याची माहिती प्रशासनाला आधीपासूनच होती. याबाबत आयुक्तांसोबत पत्रव्यवहारही झाला होता. तरीही पर्यायी व्यवस्था उभारण्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. शहराची वाढ, वाढता कचरा आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन वेळेत उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोला सर्वपक्षीय विरोध झाल्यानंतरही प्रशासनाने पर्यायी जागेचा शोध घेतला नाही. नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून प्रश्न सोडविण्याऐवजी प्रशासन जबाबदारी झटकत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, महापौर रवी लांडगे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन पवार यांनी दिला.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, अनिल सोमवंशी, पार्थ गुरव, गणेश आहेर, ॲड. सलाम शेख, नितीन चौधरी, प्रशांत मोरे, श्रीकुमार गंधारे, रवी मोंढवे, शरद जगताप, अनिल भोईर, विशाल व्यवहारे, प्रवीण शाबूगे, कल्पना शेळे, वैशाली वाळके, ॲड. वैशाली कुंभार, योगिनी मोहन, नफिसीन शेख यांच्यासह शिवसैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“मोशी कचरा डेपोची मुदत संपल्याची माहिती प्रशासनाला होती. तरीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप कामगारांचा बळी गेला. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी प्रशासनाने जबाबदारी टाळली. जर नागरिकांच्या प्रश्नांबाबत आयुक्तांना काहीच देणं-घेणं नसेल, तर त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.”
— चेतन पवार, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
