सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण सूचना
पिंपरी चिंचवड, दि. ३ जुलै : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या आषाढी वारी-२०२६ पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथील मंदिर परिसरासह संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करून सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी पोलीस आयुक्तांनी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान समितीच्या कार्यालयाला भेट देऊन प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा), पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांच्यासह अन्य विश्वस्तांशी चर्चा केली. पालखी सोहळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी, गर्दी व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली. तसेच नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पालखी रथाचीही त्यांनी पाहणी केली.
मंदिर परिसरातील दर्शनबारीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्सी व बॅरिकेडिंगची प्रभावी व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. संस्थान समितीच्या वतीने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
यानंतर पोलीस आयुक्तांनी थोरल्या पादुका मंदिर आणि मॅग्झीन चौक (भोसरी फाटा) येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणांची पाहणी केली. थोरल्या पादुका मंदिर परिसरात प्रवेशद्वार आणि दर्शनबारी येथे मजबूत बॅरिकेडिंग उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बीआरटी मार्ग बंद ठेवून समर्पित एकल मार्ग सुरू ठेवत पालखी मार्गावरील वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पालखी मार्गातील झाडांच्या अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटणे, कमानी हटविणे तसेच इतर अडथळे दूर करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
मॅग्झीन चौक, भोसरी फाटा येथे पालखी रथासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाची पाहणी करताना पोलीस आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना डीजे किंवा डॉल्बीला परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वागत मंडपातील उद्घोषणेसाठीच ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी असेल, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, रोहीदास पवार, धीरज पाटील, विक्रांत देशमुख तसेच आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
