पिंपरी, दि. ३ जुलै : खराळवाडी येथील महावितरणच्या पिंपरी कॅम्प शाखा कार्यालयात २८ जून २०२६ रोजी एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचारी व उपस्थित ठेकेदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांनी महावितरणच्या पिंपरी विभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
कुदळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारी कार्यालयात वाढदिवसासारखे वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्यास परवानगी आहे का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वाढदिवस साजरा होत असताना दोन ठेकेदार उपस्थित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्या कार्यालयातून वीज वितरणाशी संबंधित महत्त्वाचे नियंत्रण व कामकाज पाहिले जाते, अशा संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असल्याची खंत कुदळे यांनी व्यक्त केली. “जर अशा महत्त्वाच्या कार्यालयात अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागतील की काय,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वाढदिवस साजरा करणारे कर्मचारी तसेच उपस्थित असलेल्या दोन्ही ठेकेदारांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा इशाराही सुहास कुदळे यांनी दिला आहे.दरम्यान, या आरोपांबाबत महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.