पिंपरी, दि.०३ जुलै : इंद्रायणी नदी वॉटर बॉडी (सरोवर) पुनर्जीवन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ४४३.५१ कोटी रुपयांच्या निविदेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांसह महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भापकर यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील मुळा, पवना आणि इंद्रायणी या तीन नद्यांसाठी प्रस्तावित नदी पुनर्जीवन प्रकल्पांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, या प्रकल्पांमुळे नदीतील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येईल, नदीपात्र अरुंद होईल, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल आणि पूरस्थिती नियंत्रणात येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यांच्या मते, नद्यांचे सुशोभीकरण करण्याऐवजी शहरातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या तुलनेत विद्यमान एसटीपीची क्षमता अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाणी थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भापकर यांनी असा आरोपही केला आहे की, इंद्रायणी नदी पुनर्जीवन प्रकल्पाची निविदा स्थायी समितीच्या ऐनवेळच्या विषयाद्वारे घाईगडबडीत मंजूर करण्यात आली. निविदा प्रक्रियेत काही ठेकेदारांना अपात्र ठरवून गुजरातमधील एका कंपनीची निविदा स्वीकारण्यात आल्याने या प्रक्रियेबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आळंदी, देहू आणि चिंचवडगाव या तीर्थक्षेत्रांमध्ये आवश्यक तेवढेच सुशोभीकरण करण्यात यावे; मात्र संपूर्ण नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सिव्हिल कामे करण्याऐवजी नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी एसटीपी प्रकल्प उभारण्यावर भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, भापकर यांनी केलेले आरोप आणि दावे हे त्यांच्या निवेदनातील असून, याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
