ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
तळेरे, प्रतिनिधी संतोष नाईक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खासगी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधून वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यांची होत असलेली बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करण्यात यावी आणि विद्यार्थी व पालकांवर शालेय साहित्य खरेदीसाठी दबाव टाकणाऱ्या शाळा व संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबुडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांना वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत संघटनेने संबंधित विषयात हस्तक्षेप करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काही शासकीय तसेच खासगी शाळा आपल्या संस्थांमार्फत शैक्षणिक साहित्याची विक्री करत असून विद्यार्थी व पालकांना महागड्या दराने साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. शासकीय नियमांनुसार शैक्षणिक संस्थांकडून अशा प्रकारे दुकानदारी करणे बेकायदेशीर असून या प्रकाराला तातडीने प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
संघटनेने प्रशासनाला सर्व शाळा व महाविद्यालयांना परिपत्रक काढून अशा प्रकारची विक्री त्वरित बंद करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संघटनेला लेखी स्वरूपात देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब, माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अपसरुद्दीन फारुकी तसेच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावस्कर यांना सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हा महिला संघटक मीनल पार्टे, कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण आणि पुस्तक विक्रेते संघटनेचे शुभम परब उपस्थित होते.
दरम्यान, या निवेदनाची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच शालेय साहित्य विक्रेता संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक मोहन पाटील यांनाही पाठविण्यात आली आहे.
